बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. अखेर पोलिसांनी बदलापूर प्रकरणामधील सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात गुन्हा घडल्यापासून सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत असलेले संस्थेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना आज पोलिसांनी अटक केली आहेत. हे दोघे कर्जत येथे लपून बसले होते. तिथेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

राज्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदे हा गेल्या आठवड्यात पोलिसांसोबत झालेल्या कथित चकमकीत ठार झाला होता. मात्र या प्रकरणात सहआरोपी बनवण्यात आलेले बदलापूरमधील त्या शाळेतील दोन पदाधिकारी मात्र मात्र फरार असल्याने पोलीस प्रशासन आणि सरकारवर टीका होत होती. तसेच या वरून न्यायालयानेही खडेबोल सुनावले होते. अखेर पोलिसांनी या फरार पदाधिकाऱ्यांचा शोध घेत त्यांना कर्जत येथून ताब्यात घेतले आहे. बदलापूरमधील त्या शाळेचे सचिव तुषार आपटे आणि चेअरमन उदय कोतवाल यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गेल्या दीड महिन्यापासून पसार असलेल्या कोतवाल आणि आपटे यांना शोधण्यासाठी ठाणे पोलिसांनी दोन पथकांची निर्मिती केली होती. हे दोघे कर्जत भागात येणार असल्याची माहिती उल्हासनगर युनिट ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळाली होती. त्यानंतर या भागात सापळा रचून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी १६ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर कोतवाल व आपटे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला हाेता. त्यानंतर हे दाेघेही भूमीगत झाले हाेते. कल्याण व मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचाही जामीन फेटाळला होता. शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील शिपाई अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करू नये, याकरिता या दोघांनी पालक व पोलिसांवर दबाव टाकला. या दोघांना राजकीय वरदहस्त असल्याचे आरोप केले गेले होते. मुख्य आरोपी शिंदे याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. शिंदे हा पोलिस चकमकीत मारला गेला. तरीही कोतवाल व आपटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांवर चाैफेर टीका झाली हाेती. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना याच प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला हाेता.