नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि परिसर खास थायलंडहुन मागविण्यात आलेल्या ‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अ‍ॅन्थुरियम’ फुलांनी गंधाळून निघाला आहे. एक टन फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे जगन्माता जगदंबेचा दरबार फुलून आला आहे. ३० कलाकारांनी सलग तीन दिवस काम करून तुळजाभवानी देवीचे महाद्वार, सिंहगाभारा, जिजाऊ महाद्वार आणि उपदेवतांची मंदिरे आकर्षक पध्दतीने सजवली आहेत. महाद्वारासमोर फुलात साकारलेला गरुड मारुती रथ भाविकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनला आहे.

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील ज्ञानेश्वर पाचुंदकर मागील १३ वर्षांपासून सेवा म्हणून तुळजाभवानी देवीच्या चरणी फुलांची आरास सादर करतात. तुळजाभवानी मंदिराप्रमाणेच विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर, आळंदीचे संत ज्ञानेश्वर मंदिर, जेजुरीचा खंडोबा, कोल्हापुरची अंबाबाई आणि रांजणगावच्या महागणपतीलाही दरवर्षी पाचुंदकर परिवाराकडून फुलांची आरास केली जाते. तुळजाभवानी देवी मंदिरात फुलांची सजावट करण्याचे त्यांचे हे तेरावे वर्ष आहे.

पुणे येथील कुमार शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ३० सप्टेंबरपासून फुलांची सजावट करण्यास सुरूवात केली. महाद्वार आणि जिजाऊ द्वाराचे तोरण, यज्ञमंंडपाला आकर्षक पध्दतीने बांधण्यात आलेले फुलतोरण, त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात असलेल्या उपदेवतांची सजावट, दगडी देवळ्यांना फुलांची माळांनी दिलेले अनोखे रूप, चांदी दरवाजा, सिंह दरवाजा, मुख्य गाभारा आणि पिंपळ पारावर केलेली लक्षवेधी सजावट येणार्‍या प्रत्येक भाविकाचे लक्ष वेधून घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *