Breaking News

रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईच्या रुग्णालयात सुरुये उपचार

ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. रतन टाटा यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. अशी माहिती रॉयटर्सने बुधवारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 7 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यानंतर त्यांच्याकडून असे कळवण्यात आले होते की, काळजीचे कोणतेही कारण नाही. वय-संबंधित वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणलं गेलं आहे. टाटा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझ्या आरोग्याबाबत पसरलेल्या अलीकडील अफवांची मला जाणीव आहे आणि मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत.”

रक्तदाब कमी झाल्याने रतन टाटा यांना सोमवारी पहाटे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आले होते. रतन टाटा यांनी मार्च 1991 टाटा सन्सची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर 28 डिसेंबर 2012 रोजी ते निवृत्त झाले. त्यांनी टाटा समुहाच्या उत्पन्नात अनेक पटींनी वाढ करुन दाखवली.

अतिशय उदार व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे. ते आता 86 वर्षांचे आहेत. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 1991 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्या नेतृत्वात टाटा समुहाने व्यवसाय क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेले.

रतन टाटा यांचे व्यक्तिमत्त्व हे संपूर्ण जगाला माहित आहे. देशाच्या कोणत्याही बिकट परिस्थितीत ते मदत करायला नेहमी सर्वात पुढे असायचे. एक साधे, थोर आणि उदार व्यक्तीमत्व, आदर्श आणि लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. छोट्या कर्मचाऱ्यांनाही ते आपले कुटुंब मानतात. आपल्या कर्मचाऱ्यांची ते फार काळजी घेतात ही त्यांनी आणखी एक चांगली बाजु आहे.

रतन टाटा यांची प्रकृती लवकर बरी व्हावी आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी देशभरातील लोकं प्रार्थना करत आहेत. रतना टाटा यांना प्रेरणास्थानी ठेवून अनेकांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रतन टाटा यांच्या सारखा हिरा या देशात जन्मला अशी प्रतिक्रिया लोकं नेहमी देत असतात.