भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या काल (बुधवारी) ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. आता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जनसागर लोटला आहे. यावेळी त्याच्या खास श्वानांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली.’पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित 86 वर्षीय टाटा यांचे बुधवारी रात्री 11.30 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या लाडक्या ‘गोवा’नेही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ‘गोवा’ नावाचा हा श्वान रतन टाटांच्या अगदी जवळचा होता. टाटांना तो काही वर्षांपूर्वी गोवा राज्यात सापडला होता, त्यानंतर त्याचे नाव ‘गोवा’ ठेवण्यात आले होते. हा कुत्रा रतन टाटा यांच्यासोबत मुंबईतील बॉम्बे हाऊसमध्ये राहत होता आणि त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला होता.
रतन टाटा यांचे व्यावसायिक जीवन जितके प्रेरणादायी होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवनातील प्राण्यांवरील प्रेमही अद्वितीय होते. ‘गोवा’ त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ होता आणि टाटांनी प्राण्यांबद्दल नेहमीच संवेदनशीलता दाखवली. रतन टाटा यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीतील एका युगाचा अंत झाला आहे.
मालकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेला गोवा देखील उदास दिसत होता. रतन टाटा एकदा गोव्यात गेले होते तेव्हा हा श्वान त्यांच्या मागे लागला होता, त्यानंतर रतन टाटा यांनी या श्वानाला सोबत घेऊन मुंबईला नेले आणि त्याचे नाव गोवा ठेवले. मुंबईतील बॉम्बे हाऊसमध्ये ‘गोवा’ इतर श्वानांसह राहतो.