जालना मध्यवर्ती बँकेची 15 दिवसांपूर्वी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीच्या काळातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ती ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आमदार राजेश टोपे यांना अर्वाच्य शिवीगाळ केली होती. त्या क्लिपबद्दल बबनराव लोणीकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ती ऑडिओ क्लिप माझी नसल्याचे सांगत राजेश टोपे आणि माझे फोनवर बोलणंच झालं नसल्याचे स्पष्टीकरण आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.

आमदार बबनराव लोणीकर यांना व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण देतान सांगितले की, जालना मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. तसेच बँकेच्या निवडणुकीविषयी आमदार राजेश टोपे आणि माझे कधी फोनवर बोलणेच झाले नाही. त्यामुळे जी व्हायरल झालेली क्लिप आहे, ती माझी नाही, आणि ती ऑडिओ क्लिप खरीही नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.आमदार बबनराव लोणीकर यांनी त्या क्लिपविषयी बोलताना ही शिव्या देण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्राची परंपरा ही विश्वासघाताची नाही तर शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आहे. त्याच बरोबर राजकारणात दिलेले शब्द पाळले पाहिजेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या क्लिपबाबत जर राजेश टोपेंनी ट्विट केले असेल तर त्याविषयी तुम्ही त्यांनाच विचारा असंही त्यांनी पत्रकारांना सांगितले.