भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात किवी संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. ३६ वर्षांनी न्यूझीलंडने भारतात कसोटी सामना जिंकला आहे. १९८८ मध्ये जॉन राईटच्याच्या नेतृत्वाखाली किवी संघाने सामना जिंकला होता. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. बंगळुरू कसोटीत टीम इंडिया आश्चर्यकारकपणे पहिल्या डावात ४६ धावांत सर्वबाद झाली. यानंतर न्यूझीलंडने ४०२ धावा केल्या आणि पहिल्या डावात ३५६ धावांची आघाडी घेतली. भारतीय संघ एका डावाने पराभूत होईल असं वाटलं होतं, पण भारताने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन करत ४६२ धावा केल्या आणि सामन्यात १०७ धावांची आघाडी घेतली. मात्र, ही आगाडी फार मोठी नव्हती. न्यूझीलंडला १०७ धावांचे लक्ष्य मिळाले. ज्यांनी २ विकेट्सवर ११० धावा करून सामना जिंकला. भारताच्या पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला, जाणून घेऊया.
रोहित शर्मा काय म्हणाला ?
भारताच्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही दुसऱ्या डावात फलंदाजीत चांगली कामगिरी केली. पण आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी करू शकली नाही. त्यामुळे पुढे काय होणार आहे हे आम्हाला कळत होते. काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. जेव्हा तुम्ही ३५० धावांनी मागे असता तेव्हा तुम्ही त्याबद्दल जास्त विचार करू शकत नाही. तेव्हा फक्त चेंडू बॅटवर येतोय का आणि फलंदाजीवर फोकस असतो. आम्ही चांगला प्रयत्न केला. काही भागीदारी फारचं रोमांचक होत्या. आम्ही सहज स्वस्तात ऑल आऊट झालो असतो, पण आम्हाला आम्ही केलेल्या प्रयत्नांचा अभिमान आहे.”
ऋषभ पंत आणि सर्फराझ खानच्या फलंदाजीबाबत रोहित म्हणाला, “दोघेही फलंदाजी करतात तेव्हा प्रत्येकजण आपापल्या जागांच्या काठावर बसलेलो असतो कारण कधीही काहीही होऊ शकतं. ऋषभने काही चेंडू सोडले आणि नंतर काही चांगले फटकेही खेळले. सर्फराझनेही चांगली खेळी केली. मी माझ्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आम्हाला माहित होते की सुरुवातीला फलंदाजी करणं कठीण होईल, परंतु आम्ही ४६ धावांवर बाद होऊ अशी अजिबातच अपेक्षा नव्हती.”
“न्यूझीलंडने चांगली गोलंदाजी केली आणि आम्ही त्यांच्या गोलंदाजीचा प्रतिकार करण्यात अपयशी ठरलो. मी दुसऱ्या दिवसानंतरच्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितले की, सुरुवातीला हवामान कसे असेल आणि ढगाळ वातावरण असेल हे आम्हाला माहीत होते, परंतु आम्ही ५० पेक्षा कमी धावांवर बाद होण्याची अपेक्षा केली नव्हती. न्यूझीलंड संघाने चांगली गोलंदाजी केली.”
“असे सामने होतच राहतात. यातून सकारात्मक गोष्टी घेत आम्ही पुढे जाऊ. आम्ही इंग्लंडविरुद्ध एक सामना गमावला आणि त्यानंतर सलग चार सामने जिंकले. अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत आणि प्रत्येकाला आपपली जबाबदारी काय आहे हे माहीत आहे.” भारतीय संघ यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिला सामना हरला होता आणि त्यानंतर चार सामने जिंकत कसोटी मालिका १-४ ने गमावला आहे.