Breaking News

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आईचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आईच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. वीणा देव यांनी जगाचा निरोप घेतल्यावर सध्या संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

आईच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘खरंतर आत्ता काही व्यक्त होण्याची ताकद नाही. आईला तिच्या कठीण काळात प्रेम देणाऱ्या, वेळी अवेळी एका फोन वर धावून येणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद.मधुरा आणि मी तुमच्यामुळे हसरा चेहरा ठेवून अवघड कामगिरी पार पाडू शकलो. आईला फुलांची प्रचंड आवड. शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे चेहऱ्यावर प्रसन्न हसू ठेवून जगली. तिची उणीव जरी भासली तरी तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या रुपानी ,तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रूपानी तिची सोबत कायम असेल. आशीर्वाद असावा!’ सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मृणाल कुलकर्णी यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मृणाल, मधुरा, तुम्हा दोघींना मातृशोक सहन करण्याची देव शक्ती देवो…विनम्र श्रद्धांजली…’ अशी कमेंट रेणुका शहाणे यांनी केली आहे.

अभिनेते-कवी सौमित्र यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत, “मृणाल! काय लिहू..! एक मुलगी म्हणून त्यांच्यासाठी तू अभिमानास्पद होतीस…आहेस. तुम्ही दोघींनी त्यांच्यासाठी जे जे आवश्यक आणि शक्य होतं ते ते केलंत…त्यांचा पुढला प्रवास सुंदर होवो हीच सदिच्छा..”

मृणाल कुलकर्णी यांच्या आई वीणा देव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. महाविद्यालयात त्यांनी तब्बल 32 वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. वीणा देव यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे…