kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

जेजूरीच्या मल्हार मार्तंडाभोवती गुंफलेले ‘मल्हार कलेक्शन’ जाणार लंडन येथील स्पर्धेला !

आपली मराठमोळी संस्कृती वैविध्यपूर्ण गोष्टींनी नटलेली आहे, यामुळे आपल्या संस्कृती विषयी, पहरावाविषयी इतरांना कायमच आकर्षण राहिलेले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजूरीच्या मल्हार मार्तंडाची वेशभूषा ही कायमच लक्षवेधी राहिली आहे. आता याचभोवती गुंफण्यात आलेले ‘ मल्हार कलेक्शन’ लवकरच सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये एका स्पर्धेसाठी जाणार असल्याची माहिती ‘तष्ट’चे संचालक दीपक माने व क्रिएटिव्ह हेड रविंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला दीपक माने, रविंद्र पवार,मंगेश अशोकराव घोणे ( विश्वस्त खंडोबा देवस्थान जेजुरी),किरण बारभाई, अशिष बारभाई(मुख्य पुजारी खंडोबा देवस्थान जेजुरी ),पै अमोल बुचडे(महाराष्ट्र केसरी) आदी मान्यवर उपस्थित होते.

‘तष्ट’ परिवार आजवर महाराष्ट्रीयन संस्कृती साता समुद्रापार नेण्यासाठी झटत आला आहे. ऐतिहासिक ‘मल्हार कलेक्शन’ साकारून ‘तष्ट’ परिवाराच्यावतीने जेजूरीच्या खंडेरायाला अनोखी मानवंदना वाहण्यात आली आहे. इंग्लंड मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एका खास स्पर्धेत हे ‘मल्हार कलेक्शन’ सहभागी होणार आहे.

याविषयी माहिती देताना ‘तष्ट’चे संचालक दीपक माने म्हणाले की, ‘मल्हार कलेक्शन’ प्रथम प्रत्यक्ष घडवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मशीनवर्क आणि हँड वर्क यांचा वापर करून हे पोशाख तयार करण्यात आले असुन यामध्ये जेजूरी गड, देवाच्या आवतीभोवती च्या गोष्टी या वस्त्रावर दिसणार आहेत. आमच्या टीमने ६ महीन्यात हे कलेक्शन तयार केले आहे. नुकतीच या वस्त्रांची जेजूरी येथे पूजा करण्यात आली आहे. लंडन येथील स्पर्धेत बक्षिसाच्या माध्यमातून जी काही रक्कम मिळेल ती जेजूरी देवस्थानाला दान करण्यात येणार आहे.

याविषयी अधिक माहिती ‘तष्ट’चे क्रिएटिव्ह हेड रविंद्र पवार म्हणाले की, “इतिहासाची पहिल्यापासूनच मला आवड होती. त्यामुळे अशा प्रकारचे ऐतिहासिक वस्त्रांचे संग्रहालय करायचे हे माझ्या मनात आधीपासूनच होते. आम्ही यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘ शिववस्त्र’ तयार केले होते, हा आमचा आणखी एक प्रयत्न आहे. प्रदर्शनानंतर आम्ही हे ‘मल्हार कलेक्शन’ एखाद्या ऐतिहासिक थीमवर विवाह करण्याऱ्या वधू – वराला देणार आहोत.

या स्पर्धेत सहभागी स्पर्धक : प्राजक्ता भंडारे,रंजना,विद्या रोकडे,सुष्मिता धुमाळ,मृणालिनी चतुर्वेदी,पूजा घोरपडे,अनिकेत चिळेकर,योगिता चौधरी,राजवीर,पूजा वाघ,नितीन गायकवाड,निकिता अवंदेकर,अश्विनी पवार,गायत्री वाघ,अश्विनी रायकर,सरिता कुंभरे,गायत्री साबळे,सीमा निंबाळकर,लीना खांडेकर,आर्या लोकर,प्रणव जाधव,अर्चना जरवणकर,श्रद्धा ठाकूर,प्रीती तायडे.