Breaking News

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सवलतीत रेल्वे उपलब्ध करुन देण्यास रेल्वे मंत्र्यांचा नकार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषिक जनतेसाठी एक भव्य मेळावा असतो. या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक आपले विचार मांडतात. राज्यभरातील दिग्गज साहित्यिक, कवी या ठिकाणी भूमिका मांडतात. अनेक दिग्गज कवी, तथा नवोदित कवी इथे आपल्या कविता सादर करतात. या संमेलनातून नवोदित लेखक आणि कवींना प्रोत्साहन दिलं जातं. नवे विचार मांडले जातात. मराठी भाषेसाठी चर्चा करुन महत्त्वाचे ठराव मांडले जातात. लाखो पुस्तकं इथे प्रदर्शनासाठी असतात. तसेच ती पुस्तक सवलतीच्या दरातही वाचकांना विकत घेता येतात. मराठी साहित्य संमेलन हे वाचकांसाठी पर्वणीच मानलं जातं. महाराष्ट्र आणि देश चालवण्यासाठी साहित्य हे खूप महत्त्वाचं आहे. पण महाराष्ट्राच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीत जाणाऱ्या साहित्यिक आणि मराठी वाचकांना रेल्वेकडून सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी साहित्य संमेलनासाठी तिकिटात सवलत देण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्राचं 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी दिल्लीत आयोजित करण्यात आलं आहे. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 या दरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअम या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर या यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. पुण्याची सरहद संस्था यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करत आहे. संस्थेकडून संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. सरहद संस्थेकडून रेल्वे मंत्रालयाला संमेलनासाठी पुणे ते मुंबई प्रवास सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्यात आली होती. पण ही विनंती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी सवलतीत रेल्वे उपलब्ध करून देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी नकार दिला आहे. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान दिल्लीत साहित्य संमेलन होणार आहे. मागील दीड महिन्यांपासून सरहद संस्थेकडून पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे मिळावी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जात होता. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली ५० टक्के सवलतीच्या दरात विशेष रेल्वे देण्यास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यालयाने आज नकार दिला.

यापूर्वी २०१५ आणि १९५४ साली झालेल्या साहित्य संमेलनासाठी १०० टक्के सवलतीच्या दरात २ रेल्वे उपलब्ध करुन दिल्याची माहिती आहे. ७० वर्षानंतर दिल्लीत होणाऱ्या संमेलनासाठी केंद्र सरकारने रेल्वे मंजूर करण्यासाठी संस्था प्रयत्नशील होती. पण तो प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहे. कारण रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयाकडूनच नकार देण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दिल्लीतील मंत्र्यांनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी आयोजकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *