भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे असे तंत्रज्ञान असलेल्या काही मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे तंत्रज्ञात अमेरिकेकडे देखील नाही, रशिया, चीननंतर भारताने या प्रकरच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीची माहिती ट्विट करून दिली आहे. ही चाचणी शनिवारी ओडीशा येथील किनाऱ्यावर घेण्यात आली.
या क्षेपणास्त्राची चाचणी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून सिंह म्हणाले की, यामुळे भारताला अशा प्रकारचे महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने एक मोठा टप्पा गाठला आहे.
हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे आपला देश अशा महत्वाच्या आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे, असे ते म्हणाले. या यशाबद्दल सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ), सशस्त्र दल आणि उद्योग जगताचे अभिनंदन केले आहे.