देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. हिवाळा सुरू होताच शहरातील हवेची गुणवत्ता विक्रमी ढासळली आहे. प्रचंड वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांना शहरात राहणे जवळपास अशक्य बनत आहे. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी दिल्ली हे शहर भारताची राष्ट्रीय राजधानी राहावी का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शशी थरूर यांनी यासंबंधी पोस्ट केली आहे. त्यांनी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) डेटाचा हवाला देत दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित (प्रदूषित) शहर असल्याचे म्हटले आहे. तसेच याबद्दल काहीच न केल्याचा ठपका त्यांनी सरकारवर ठेवला आहे.
शशी थरूर यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “दिल्ली अधिकृतपणे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे, चौपट धोकादायक पातळी आणि दुसर्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर, ढाकापेक्षा परिस्थिती जवळजवळ पाचपट वाईट आहे. आपले सरकार वर्षानुवर्षे ही भीषण परिस्थिती पाहत आहे आणि त्याबद्दल काहीही करत नाही, हे समजण्याच्या पलीकडचे आहे”.
याबरोबरच प्रदूषण नियंत्रणाबद्दल आपण केलेल्या प्रयत्नांची माहिती देखील शशी थरूर यांनी दिली आहे. थरूर म्हणाले, “मी २०१५ पासून अनेक तज्ज्ञ, भागधारक यासह खासदारांसाठी एअर क्वालिटी राऊंड टेबल चर्चा घेतल्या, परंतु गेल्या वर्षापासून ते सोडून दिले कारण काहीही बदललेले दिसत नव्हते आणि कोणालाही काही फरक पडताना दिसला नाही. या शहरात नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांत वास्तव्य करणे शक्य नसते आणि उरलेल्या वर्षभरात जेमतेम राहता येऊ शकते. खरंच ही देशाची राजधानी राहावी का?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सोबत शशी थरूर यांनी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि एनसीआर या भागांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचली आहे. या भागात राहाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न तयार झाला आहे. दिल्लीत हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या केंद्रांना मंगळवारी सकाळी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा ५०० अंकांपर्यंत गेल्याचे दिसून आले. शहरात गेल्या सात दिवसांपासून धुक्याचा दाट थर पाहायला मिळतो आहे. शहराचा एक्यूआय सोमवारी ४९४, रविवारी ४१४ आणि शनिवारी ४१७ इतका होता.
दरम्यान, दिल्ली सरकारने हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेला ‘मेडिकल एमर्जन्सी’ म्हटले आहे आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर खराब हवेमुळे दिल्ली-एनसीआरमधील शाळा आणि महाविद्यालये ही ऑनलाइन भरवली जात आहेत.