Breaking News

एस्सार समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचं निधन !

एस्सार समूहाचे सहसंस्थापक अब्जाधीश शशी रुईया यांचं सोमवारी रात्री उशिरा वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल उद्योग जगतात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. रुईया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

रुईया यांचं पार्थिव आज दुपारी १ ते ३ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी चार वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. कुटुंबीयांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शशी रुईया यांच्या पश्चात पत्नी मंजू, प्रशांत आणि अंशुमन ही दोन मुले आहेत.

शशी रुईया यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९६५ मध्ये केली होती. भाऊ रवी यांच्यासोबत शशी रुईया यांनी एस्सार ग्रुपची स्थापना केली. तब्बल ५५ वर्षांच्या कारकिर्दीत दोन्ही बंधूंनी एस्सार समूहाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. एस्सार समूहाच्या वाढीत शशी रुईया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शशी रुईया आणि रवी रुईया यांनी १९६९ मध्ये एस्सार ग्रुपची स्थापना केली होती. पहिली ऑर्डर अडीच कोटी रुपयांची होती. मद्रास पोर्ट ट्रस्टच्या वतीनं एस्सारनं ही ऑर्डर दिली होती. सुरुवातीला एस्सार ग्रुप बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रात काम करत होता. कंपनीनं अनेक पूल, पॉवर प्लाण्ट आदींची उभारणी केली आहे. १९८० मध्ये एस्सार समूहानं ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला.

१९९० च्या दशकात कंपनीनं आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. एस्सार समूहानं पोलाद, दूरसंचार क्षेत्रातही पाऊल टाकलं. टेलिकॉम, बीपीओ, ऑइल अँड गॅस सेक्टरचा बिझनेस पोर्टफोलिओ ४० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.

शशी रुईया हे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (फिक्की) व्यवस्थापकीय समितीचे सदस्य होते. याशिवाय ते इंडो यूएस जॉइंट बिझनेस कौन्सिलचे अध्यक्षही होते. इंडियन नॅशनल शिपओनर्स असोसिएशनचे ते अध्यक्षही होते. शशी रुईया यांनी पंतप्रधान भारत यूएस सीईओ फोरम आणि भारत जपान बिझनेस कौन्सिलचे सीईओ म्हणूनही काम पाहिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *