भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ६ डिसेंबरपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. यावेळी ॲडलेडमध्ये दोन्ही संघांमध्ये पिंक बॉल टेस्ट खेळवली जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड याने भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे कौतुक केले आहे.
ट्रॅव्हिस हेड याला वाटते की जसप्रीत बुमराह क्रिकेट खेळातील महान वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जाईल. तसेच, आपण बुमराहसारख्या गोलंदाजाचा सामना केला, हे अभिमानाने माझ्या नातवंडांना सांगेन, हेड म्हणाला.
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहने चमकदार कामगिरी केली, ज्यामुळे भारताने हा सामना २९५ धावांनी जिंकला. बुमराहने दोन्ही डावात मिळून ८ विकेट्स घेतल्या, ज्यात पहिल्या डावात ५ विकेट्सचा समावेश होता.
ट्रॅव्हिस हेडने सोमवारी पत्रकारांना सांगितले की, जसप्रीत हा महान वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाईल. तो आमच्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे गर्वाची गोष्ट आहे.
भविष्यात जेव्हा मी माझ्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहीन तेव्हा मी माझ्या नातवंडांना अभिमानाने सांगेन की मी त्याचा (बुमराह) सामना केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध खेळणे वाईट नाही. मला आशा आहे की भविष्यातही त्याच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, पण त्याचा सामना करणे आव्हानात्मक आहे.
पर्थमध्ये अर्धशतक झळकावणारा हेड हा एकमेव ऑस्ट्रेलियन फलंदाज होता. टॉप ऑर्डरचे फलंदाज स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन धावा करण्यासाठी धडपडत होते, परंतु मधल्या फळीतील या स्फोटक फलंदाजाने भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना केला.
आता दोन्ही संघ पिंक बॉल टेस्टसाठी ॲडलेडमध्ये आमनेसामने येणार आहेत. २०२० मध्ये टीम इंडिया ॲडलेडमध्ये ३६ धावांवर ऑलआऊट झाली होती. त्या सामन्याची आठवण करून देताना हेड म्हणाले, सामना लवकर संपल्याचे आठवते. आम्ही तो सामना खूप एन्जॉय केला. हे पुन्हा करणे चांगले होईल परंतु पुढील सामन्यात असे होईल असे मला वाटत नाही.