Breaking News

सुखबीर सिंग बादल यांना शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा ‘अकाल तख्त’कडून धार्मिक शिक्षा जाहीर

पंजाबमधील शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गंभीर आरोप करत ‘अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांनी सोमवारी बादल आणि इतर वरिष्ठ नेत्यांना ‘तनखा’ (धार्मिक शिक्षा) ठोठावली. या शिक्षेचा एक भाग म्हणून, बादल आणि २०१५ पासून राज्यातील मंत्र्यांसह अकाली दलाच्या ‘कोअर कमिटी’ सदस्यांना शौचालये स्वच्छ करणे, लंगरमध्ये सेवा करणे, नितनेम (दररोज शीख प्रार्थना) करणे आणि सुखमनी साहिबचे पठण करण्याचे आदेश दिले आहेत.

जथेदारांनी पक्षाच्या कार्यसमितीला बादल यांचा राजीनामा स्वीकारण्याचे निर्देश दिले. तसेच सदस्यत्व मोहीम सुरू करण्यासाठी आणि नवीन नेतृत्व निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणाही या वेळी केली. सुवर्ण मंदिरातील शिखांचे सर्वोच्च आसन असलेल्या ‘अकाल तख्त साहिब’ येथे याबाबतची कार्यवाही सोमवारी पार पडली.

दरम्यान, आरोग्याच्या तक्रारींमुळे सुखबीर बादल आणि सुखदेव सिंग धिंडसा यांना गुरूंच्या निवासस्थानी दोन दिवस द्वारपाल म्हणून काम करण्यास, पारंपरिक सेवक पोशाख घालून भाले धारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रण रहीमला माफी देणारे माजी जथेदार ग्यानी गुरबचन सिंग यांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलण्यापासून प्रतिबंधित करून त्यांना प्रदान केलेल्या सर्व सुविधा मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना देण्यात आलेली ‘फखर-ए-कौम’ (राष्ट्राची शान) ही पदवीही जथेदारांनी रद्द केली. विशेष म्हणजे ही पदवी बहाल केलेले ते पहिले राजकीय नेते होते. अमृतसरमधील अकाल तख्तच्या ‘फसील’वरून (पॉडियम) आदेश उच्चारत ही घोषणा करण्यात आली. पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल यांचे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निधन झाले.