मारकडवाडीतील गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया राबविल्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याने आज होणारं मतदान रद्द करण्यात आलं. पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
मारकडवाडीतून राम सातपुते यांना 843 तर उत्तम जानकरांना 1003 मतं मिळाली. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. सातपुतेंना फक्त 100 ते 150 मते अपेक्षित होती. तर जानकरांना दीड हजार पेक्षा जास्त मतं अपेक्षित होती. हे सगळं ईव्हीएममध्ये घोळ करुन केल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आणि आज त्याची प्रक्रिया पार पडणार होती.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरज मतदारसंघातील मारकडवाडी गावातील भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेचा मास्टर माईंड हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आहेत. रणजितसिंह यांची लवकरच पक्षातून हकालपट्टी होईल आणि माळशिरस तालुक्यात लवकरच उत्तम जानकर यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द होऊन पोटनिवडणूक लागेल, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका आहे. आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी सोलापूरच्या मारकडवाडी ग्रामस्थांनी आज (मंगळवार, ३ डिसेंबर) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. पण प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करून, पोलिसी बळाचा वापर करून गावक-यांना मतदानापासून रोखले. मारकडवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे. त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.