एकेकाळी खांद्याला खांदा लावून क्रिकेटचं मैदान गाजवणारे व नंतर कारकीर्दीतल चढउतारानंतर दुरावलेल्या दोन जिगरी मित्रांची नुकतीच मुंबईत भेट झाली. हे जिगरी मित्र म्हणजे भारताचे दोन माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
भेटीचे निमित्त होते सचिन आणि विनोदचे मार्गदर्शक आणि प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरण समारंभाचं. या दोन क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीला आकार देणाऱ्या गुरुच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात दोन शिष्यांची झालेली भेट संस्मरणीय ठरली.
कार्यक्रमाच्या स्टेजवर विनोद कांबळी असल्याचं पाहून सचिन त्याला भेटायला गेला. सचिनला पाहून विनोद कांबळी भारावला. त्यानं सचिनचा हात हातात घेतला. तो हात सोडायलाच तयार नव्हता. त्यानंतर एका प्रसंगात विनोद कांबळी सचिनला मिठी मारत असून त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसत होता. त्यांच्या या भेटीकडे सगळे उपस्थित डोळे लावून होते.
सचिन आणि कांबळी हे दोघेही आचरेकरांचे विद्यार्थी शालेय क्रिकेटच्या काळात चर्चेत आले होते. दोघांनीही आपल्या दमदार फलंदाजीचं कौशल्य दाखवत ६६४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी रचली होती. सचिननं क्रिकेट इतिहासातील सर्वात चमकदार कारकीर्द घडवली, तर कांबळीच्या कारकीर्दीनं वेगळं वळण घेतलं. आपल्या स्वभावामुळं विनोद कांबळी पुढं वादग्रस्त ठरला आणि क्रिकेटच्या मैदानापासून बाहेर फेकला गेला. मात्र दोघांमधील मैत्रीचं नातं कायम आहे.
या कार्यक्रमाला माजी क्रिकेटपटू आणि आचरेकरांचे इतर शिष्य पारस महांब्रे, प्रवीण आमरे, बलविंदरसिंग संधू, समीर दिघे आणि संजय बांगर आदी उपस्थित होते.
मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक बनला. त्याच्या नावावर असंख्य विक्रम नोंदवले गेले. त्याला अनेक मानसन्मान मिळाले. दुसरीकडं, कांबळीनं सुरुवातीच्या दोन कसोटीत सलग द्विशतकं झळकावत सुरुवात धडाक्यात केली, परंतु नंतर तो मागे पडला. विनोद कांबळी हा एकूण १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळला. सन २००० मध्ये त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली.
मैदानाबाहेर कांबळीला आर्थिक, मानसिक व आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागला. तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पूर्णपणे बीसीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून आहे, असं २०२२ मध्ये त्यानं स्वत:च सांगितलं होतं. काही महिन्यांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो चालताना धडपडत असल्याचं दिसत होतं. मात्र त्या व्हिडिओची सत्यता पटू शकली नव्हती.