जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवार 15 डिसेंबरला अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. झाकीर हुसेन लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थनाही केल्या जात होत्या, पण डॉक्टरांना झाकीर हुसेन यांना वाचवण्यात यश आलं नाही.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात झाकीर हुसेन यांच्यावर उपचार सुरू होते. झाकीर हुसैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला त्याच्या जवळच्या मित्राने दुजोरा दिला होता. बीबीसीचे पत्रकार परवेझ आलम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये त्यांच्या खराब प्रकृतीबद्दल सांगितलं होतं.
झाकीर हुसेन हे संगीत जगतातील एक मोठे नाव होतं. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 1951 मध्ये मुंबईत झाला. झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठं आहे. झाकीर हुसेन यांचे वडील अल्ला राख हे देखील प्रसिद्ध तबलावादक होते. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बँडने अलीकडेच जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत दौऱ्याची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या संगीतातून अनेक भारतीयांना प्रेरणा दिली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांच्या देखरेखीखाली त्यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली. झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7व्या वर्षी पहिला परफॉर्मन्स दिला होता. झाकीर हुसेन हे पहिले भारतीय आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टसाठी आमंत्रित केले आहे.
या पुरस्कारांनी झाकीर हुसैन यांचा सन्मान
त्यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.झाकीर हुसैन यांना 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता.
चार वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मान
2009 मध्ये 51 व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उस्ताद झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, त्यापैकी त्यांना हा पुरस्कार चार वेळा मिळाला होता.