Breaking News

पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम

पुणे पुस्तक महोत्सवात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम शनिवारी करण्यात आला आहे. या विक्रमासाठी तब्बल ९७ हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम झाला आहे. या विक्रमाच्या निमित्ताने आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून, आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संयोजन समितीचे सदस्य प्रविण तरडे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे, डॉ. संजय चाकणे, मंदार जोशी, मिलिंद कांबळे, सुनील भंडगे, स्वामिराज भिसे आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विक्रम करण्यात आला आहे. या विक्रमाच्या निमित्ताने संविधानाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केले आहे. या विक्रमासाठी अविरतपणे काम केलेल्या सर्व टीमचे मनापासून आभार मानतो, अशी माहिती पांडे यांनी दिली. पुस्तकांपासून तयार केलेले संविधानाचे हे सर्वात मोठे शिल्प आहे. त्यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. हे शिल्प साधारण १० मीटरचे आहे. त्यासाठी ९७ हजार २० पुस्तके वापरण्यात आली. साधारण ८० स्वयंसेवक आठ दिवसांपासून हा विक्रम होण्यासाठी कार्यरत होते, असे राहुल पाखरे यांनी सांगितले. या शिल्पाच्या आरखड्यासाठी पूजा मुंडे आणि स्वरूप कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.

पुणे पुस्तक महोत्सवात पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती पाहण्याची आज रविवारी २२ डिसेंबरला शेवटची संधी आहे. महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांना सकाळी १० ते रात्री १० या वेळेत विक्रमाचे शिल्प पाहता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी पुणे महोत्सवाला भेट देऊन, पुस्तके खरेदी करावी आणि संविधानाचे शिल्प पाहावे, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *