मंगळवारी संध्याकाळी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जवान शहीद झाले. तसेच अनेक जवान जखमी झाले. बलनोई भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस आणि लष्कराच्या पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
तर, इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ११ मद्रास लाइट इन्फंट्री (11 MLI) चे वाहन निलम मुख्यालय ते बालनोई घोरा पोस्टकडे जात असताना हा अपघात झाला. वाहन गंतव्यस्थानाजवळील दरीत अंदाजे ३५० फूट खाली कोसळले. अपघाताची माहिती मिळताच ११ एमएलआयच्या क्विक रिॲक्शन टीमने बचाव कार्य करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमी जवानांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली असून त्यांना उपचारांसाठी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या अशाच अपघातात जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एका लष्करी जवानाचे वाहन रस्त्यावरून घसरून दरीत पडल्याने एका जवानाचा मृत्यू झाला होता. तर एकजण जखमी होता. कालाकोट येथील बडोग गावाजवळ ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या अपघातात नाईक बद्रीलाल आणि शिपाई जय प्रकाश गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बद्रीलाल यांचा मृत्यू झाला.
२ नोव्हेंबर रोजीही, जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात एक महिला आणि तिच्या १० महिन्यांच्या मुलासह तिघांचा मृत्यू झाला आणि त्यांची कार डोंगराळ रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळली होती.