संसदेजवळ एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना बुधवारी घडली. आत्मदहनाच्या प्रयत्नात हा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून पेट्रोल जप्त करण्यात आले असून या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती यूपीतील बागपत येथील रहिवासी आहे. जितेंद्र असे त्याचे नाव आहे. त्याने रेल्वे भवनाच्या चौकात स्वत:ला पेटवून घेतले. स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी काही नागरिकांसह आग विझवली. जितेंद्रला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जितेंद्रने स्वत:ला पेटवून का घेतले? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ख्रिसमस आणि नववर्षासाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक असताना ही घटना घडली आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांची पथके सतत गस्त घालत असतात. वाहनांची ही कसून तपासणी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रकडून पोलिसांना सुसाईड नोटही मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.