महाराष्ट्राच्या ५८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२५ ला परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात मिलिट्री डेरी फार्म, शास्त्री नगर, पिंपरी हाऊसच्या जवळ, पिंपरी, पुणे (महाराष्ट्र) येथील विशाल मैदानावर केले जात आहे.
हा विशाल आध्यात्मिक संत समागम यशस्वी करण्यासाठी २५ डिसेंबर, २०२४ रोजी विधिवत रूपात स्वैच्छिक सेवांचा शुभारंभ झालेला आहे. तेव्हापासूनच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे सदस्य, स्वयंसेवक व भाविक भक्तगण मोठ्या तन्मयतेने, निष्ठेने आणि निष्काम भावनेने समागम स्थळावर पोहचून पूर्वतयारीमध्ये आपले योगदान देत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि भक्ति व सेवाभावनेच्या इतिहासाची महान परंपरा लाभलेल्या पुण्यनगरी ला प्रथमच महाराष्ट्राचा प्रादेशिक संत समागम आयोजित करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. आध्यात्मिकतेचा आधार घेऊन या समागमामध्ये प्रेम, शांति आणि एकत्वाचा संदेश दिला जातो जो नि:संदेह समस्त मानवतेच्या कल्याणार्थ असतो. सर्वविदित आहे, की या संत समागमाची भव्यता ही केवळ त्याच्या क्षेत्रफळाने अधोरेखित होत नाही, तर याठिकाणी देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविक भक्तगणांच्या भावनेमध्ये साठलेली आहे.
निरंकारी संत समागम मानवतेचा असा एक दिव्य संगम असतो जिथे धर्म, जात, भाषा, प्रांत तसेच गरीब-श्रीमंत आदि बंधनांच्या पलीकडे जाऊन सकळजन मर्यादेत राहून प्रेम आणि सौहार्दपूर्ण भावाने सेवा, सिमरण आणि सत्संग करतात. हे त्याच संदेशाचे अनुसरण आहे जो समस्त संतांनी, गुरु-पीरांनी वेळोवेळी दिलेला आहे. या तीन दिवसीय संत समागमामध्ये भक्तिच्या अनेक पैलुंवर गीत, विचार आणि कविता आदि माध्यमातून भक्तगण आपले शुभ भाव प्रकट करतील. सदगुरू माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रवचनरुपी अमूल्य उपहाराचा देखील सर्वांना लाभ होणार आहे. यावर्षी सदगुरू माताजींनी समागमाचा विषय दिलेला आहे – ‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ (विस्तार, असीम की ओर) , त्यानंतर यंदाच्या सर्व संत समागमाची हीच थीम असेल.
महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध संस्कृती, सभ्यतांचा एक अनुपम संगम दृष्टीगोचर होईल ज्यामध्ये सहभागी होऊन भाविक भक्तगण आणि प्रभुप्रेमी सज्जन अलौकिक आनंदाची अनुभूती प्राप्त करतील. यावरुन आपण म्हणू शकतो, की या दिव्य संत समागमाचा उद्देश मानवता व विश्वबंधुत्वाची सुंदर भावना सदृढ करणे हा आहे जो केवळ ब्रह्मानुभूतीद्वारेच शक्य आहे.
संत निरंकारी मंडळाचे समागमाचे चेअरमन श्री.शंभुनाथ तिवारी यांनी सांगितले, की सर्व संतांच्या निवासाची, भोजनाची, स्वच्छता गृहांची, आरोग्याची, सुरक्षेची, आगमन-प्रस्थानाची व इतर सर्व मूलभूत सुविधांची तयारी केली जात आहे. यासाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य लाभत आहे. समागमाच्या आयोजनाशी संबंधीत सर्व वैधानिक पैलू लक्षात घेऊन सारी व्यवस्था करण्यात येत आहे. थोड्याच दिवसांत हे मैदान ‘भक्तीच्या नगरी’चे रूप धारण करेल जिथे देशभरातून लाखोंच्या संख्येने भक्तगण येऊन सहभागी होतील. मानवतेच्या या महासंगमामध्ये समस्त धर्म-प्रेमी बंधु-भगिनींचे हार्दिक स्वागत आहे.