प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. दररोज लाखो लोक अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. रविवारी महाकुंभ मेळ्या दरम्यान सेक्टर 19-20 मध्ये आग लागली होती. विवेकानंद सेवा समिति वाराणसीच्या टेंटमध्ये जेवण बनवताना ही आग लागली. आग कशी लागली, त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही आग वेगाने पसरली. त्यामुळे आसपासचे तंबू यामध्ये जळून खाक झाले. या टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे ब्लास्ट झाले. जवळपास 20 ते 25 तंबू या आगीत जळाले. सिलेंडर स्फोटामुळे आग भडकली होती. आता या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असं म्हटलं आहे.
अग्निशमन दलाच्या सहा गाड्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. पोलीस आणि एनडीआरएफच्या टीम्सनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसपासचे हिस्से रिकामे केले. शास्त्री पुल आणि रेल्वे पुल दरम्यान ही आग लागली होती. हा पूर्ण भाग महाकुंभ क्षेत्रामध्ये येतो. टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडर्सचे एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाले, त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण केलं. सिलेंडर ब्लास्टमुळे आग वेगाने पसरली.