Breaking News

महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सुरुवात

आज जिथे एकीकडे देश आणि समाज संकीर्णता आणि संकुचित वृत्तीच्या भिंतींमध्ये अडकला आहे, तिथे दुसरीकडे संत निरंकारी मिशन या भिंती तोडून अमर्याद विस्ताराच्या दिशेने प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे. सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पवित्र सान्निध्यात महाराष्ट्राचा ५८ वा वार्षिक निरंकारी संत समागम २४ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित केला आहे. यामध्ये “विस्तार – अनंताच्या दिशेने” या विषयावर आध्यात्मिक विचारधारेचे दिव्य रूप सजणार आहे.

सुमारे ३०० एकर च्या विस्तीर्ण क्षेत्रावर साजरा होणाऱ्या या भक्तीमय महायज्ञात देश-विदेशातील लाखो श्रद्धाळू, भक्त आणि मान्यवर सहभागी होतील. त्याचबरोबर निरंकारी संत समागम चे थेट प्रसारण मिशनच्या वेबसाइट (www.nirankari.org/live) वर जगभरातील अनेक आध्यात्मिक प्रेमींना पाहायला मिळणार आहे. या समागमाचे सर्व व्यवस्थापन संत निरंकारी मिशनच्या सेवादलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले आहे.

संत निरंकारी मंडळाचे समागम चेअरमन श्री शंभूनाथ तिवारी यांनी माहिती देताना सांगितले की आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, कॅन्टीन, पार्किंग, स्वच्छता आणि इतर मूलभूत सेवा सांभाळण्यासाठी संत निरंकारी सेवादलाचे सुमारे १५,००० सदस्य समर्पित भावनेने सेवा देतील.

संत समागमाच्या तीनही दिवसांमध्ये दुपारी २:०० ते रात्री ८:३० या वेळेत सत्संगाचा मुख्य कार्यक्रम आयोजित होईल. यात विविध संत महात्मा आपले विचार मांडतील आणि समर्पित संगीतकार भक्तिरसाची उधळण करतील. यात सर्वच वयोगटांतील विविध भाषा बोलणारे श्रद्धाळू सहभागी होतील. याशिवाय, दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील एक आध्यात्मिक कवी दरबार संत निरंकारी समागम चे विशेष आकर्षण ठरेल. सत्संगाच्या शेवटी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांचे प्रेरणादायी प्रवचन सर्वांना प्रेरणादायक ठरेल.

निरंकारी मिशनच्या कलाकारांकडून एक आगळीवेगळी प्रदर्शनी ही आयोजित करण्यात आली आहे. यात मिशनचा इतिहास, तत्त्वज्ञान, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचे भावपूर्ण चित्रण सादर करण्यात आले आहे. तसेच मिशनद्वारे प्रकाशित सर्व मासिके आणि पुस्तकेही समागमा मधे उपलब्ध असतील.

या भव्य-दिव्य संत समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाशी संबंधित विविध यंत्रणांचेही मोलाचे योगदान मिळत आहे. मानवाच्या मनोवृत्तीला ज्ञान आणि विचारांच्या माध्यमातून अमर्याद विस्तार देणाऱ्या या संत समागमात आपले स्वागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *