देशाचा 2025-26साठीचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला आहे. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्प निराशाजनक असून शेतकरी, सर्वसामान्य, कष्टकरी यांना काहीही मिळालेले नाही. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.
करदात्यांना दिलेल्या सवलतीचा उल्लेख करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे. ही करसवलत म्हणजे राजा उदार झाल्याचे दिसत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राजा उदार झाला अन् अनेक अटी, छुप्या करांसह करसवलत दिली, असा प्रहार आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर केला आहे.
2012-14 च्या सुमारास निवडणुकीपूर्वी आयकर रद्द करण्याची घोषणा करणारा भाजप आता अधिक उदार झाल्याचे दिसत आहे. आता ते करांची श्रेणी आणि रिबेटवर करदात्यांशी वाटाघाटी करत असल्यासारखी करसवलत जाहीर करत आहेत. बऱ्याच अटी आणि अनेक छुप्या करांसह ही करसवलत देण्यात येत आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
देशात जनतेने आपली ताकद दाखवली आहे. भाजपला जनतेने 240 जागांवर रोखले आहे. याआधी बहुमत असलेल्या सरकार जनतेला गृहीत धरत होते. आता सरकार आयकर सवलती आणि अतर सवलतींबाबत घोषणा करत आहे. मात्र, त्यांनी जाहीर केलेल्या श्रेणींपर्यंत पैसे कसे कमवायाचे, याचे काही मार्ग त्यांनी ठेवले आहेत काय? असा सवाल करत देशात सर्वाधिक बेरोजगारी असताना ती रोखण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
अर्थसंकल्पीय भाषणात झालेल्या उल्लेखांबद्दल मी बिहारसाठी खूप आनंदी आहोत. बिहारला अर्थसंकल्पात भरभरून मिळाले आहे. तसेच याआधी बिहारसाठी 2015 मध्ये भाजपने दिलेले 1.25 लाख कोटी रुपयांचे पॅकेज आणि 2024 मध्ये भाजपने दिलेले मोठे पॅकेज त्यांना आधीच मिळाले असले, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी सरकारला लगावला. अर्थसंकल्पातील घोषणा बिहारच्या लोकांच्या गरजा पूर्ण करतात का? असा सवालही त्यांनी केला.
अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा उल्लेखही न करणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सातत्याने सर्वाधिक कर भरणाऱ्यांचा, सर्वाधिक जीएसटी भरणाऱ्या महाराष्ट्र आणि मुंबईतील जनतेचा अपमान करण्यात आला आहे. राज्याला वेळेवर त्याचा पूर्ण जीएसटी मिळत नाही, तसेच विकासासाठी निधीही मिळत नाही, असेही ते म्हणाले. 2014 पासून भाजपने आतापर्यंतच्या सर्व अर्थसंकल्पात महाराष्ट्राकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला. याआधीच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे 100 पेक्षा जास्त आमदारांना निवडून दिल्याबद्दल महाराष्ट्राला शिक्षा मिळत आहे काय? असा सवालही त्यांनी केला.
मुळात भाजप पायाभूत सुविधांच्या वाढीबद्दल बोलत असताना, प्रत्यक्षात कंत्राटदारांवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर काम करत आहे. आवडत्या कंत्राटदारांना कंत्राटे मिळतात मुंबई-गोवा/मुंबई-नाशिक/मुंबई-अहमदाबाद सारखे भयानक रस्ते बनवतात, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
भाजप आणि त्यांच्या केंद्र सरकारकडून आपल्याला इतकी वाईट वागणूक मिळते, यात आपले पाप काय आहे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात राज्य परिवहन बस आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ झाल्याने सामान्य माणूस अजूनही त्रस्त आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा यासारख्या दैनंदिन बाजारपेठेत खरेदी करताना लोकांना अजूनही महागाईचा सामना करावा लागत आहे – शेतकऱ्यांचे उत्पन्न
कमी न करता, ते परवडणारे बनवण्यासाठी सरकारकडे काय उपाय आहे? असेही ते म्हणाले.