डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. दरम्यान अमेरिकेने बुधवारी त्यांच्या देशात बेकायेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीय नागरिांना मायदेशी पाठवले होते. आता ते अशा पद्धतीने अमेरिकेत राहणाऱ्या आणखी ४८७ भारतीयांना माघारी पाठवणार आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी माहिती देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत या प्रकरणावर बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, अमेरिकेने केंद्र सरकारला त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ४८७ भारतीय नागरिकांची माहिती दिली असून, त्यांच्या हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, “अमेरिकेने भारताला ४८७ संभाव्य भारतीय नागरिकांबद्दल माहिती दिली आहे, ज्यांना हद्दपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आम्ही अमेरिकन प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले आहे की, माघारी पाठवत असलेल्या भारतीयांशी कोणतेही अमानुष वर्तन सहन केले जाणार नाही. जर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाची माहिती मिळाली तर, आम्ही वरिष्ठ पातळीवर हा मुद्दा उपस्थित करू.”