kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

उद्यापासून बारावी बोर्ड परीक्षा ; ‘कॉपीमुक्ती’साठी २७१ भरारी पथके

बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा उद्यापासून म्हणजेच ११ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. राज्यात एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या या परीक्षेत यंदा एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. तसेच ३७ तृतीयपंथी परीक्षा देत आहेत. राज्यातील ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधित बारावी बोर्ड परीक्षा होणार आहे. राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. ३३७३ मुख्य परीक्षा केंद्रे आणि ३३७६ उपकेंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. यंदा विज्ञान शाखेला ६८ हजार ९६७ विद्यार्थी, कला शाखेला ३ लाख ८० हजार ४१० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला ३ लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रमाला ३१ हजार ७३५ विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स ४ हजार ४८६ असे एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत.

बोर्डाच्या परीक्षा काळात कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पदके स्थापन करण्यात आली आहेत. राज्यातील ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील. त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी मंडळांनी अर्ध शासकीय पत्राद्वारे आव्हान केलेले आहेत.