इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने भारतात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर Tesla Inc ने भारतीयांसाठी नोकरीची ऑफर दिली आहे.
इलॉन मस्कची कंपनी टेस्लाने भारतासाठी नोकऱ्या देऊ केल्या आहेत. कंपनीने आपल्या LinkedIn खात्यावर 13 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. कस्टमर सपोर्ट ते बँकएण्ड अशा नोकऱ्यांचा समावेश आहे. मुंबई आणि दिल्ली या दोन शहरात 13 जागा भरण्यासाठी टेस्लाची जाहिरात लिंक्डइनवर देण्यात आली आहे.
ऑर्डर ऑपरेशन एक्सपर्ट, सर्व्हिस टेक्निशियन, कस्टमर सपोर्ट स्पेशालिस्ट, बिझनेस ऑपरेशन्स अॅनालिस्ट, सर्व्हिस मॅनेजर, स्टोर मॅनेजर, कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर, कस्टरम सपोर्ट सुपरव्हायझर, ऑर्डर ऑपरेशन्स स्पेशालिस्ट, इनसाईड सेल्स अॅडव्हायझर, पार्ट्स अॅडव्हायझर, टेस्ला अॅडव्हायझर, डिलिव्हरी ऑपरेशन्स स्पेशालिस्ट या पदांसाठी ही भरती आहे.
आंतरराष्ट्रीय कार निर्माते जर त्यांच्या परदेशी बनलेल्या गाड्या भारतात आणून विकत असतील तर त्यावर 100 टक्के आयात कर लावण्यात येतो. टेस्लाची कार बनवण्याचा प्लांट चीनमध्ये आहे. त्याच प्लांटमधून भारतीय बाजारासाठी कार आणण्यासाठी मस्क आग्रही होते. पण 100 टक्के आयात कर कमी करावा, अशी मस्क यांची मागणी होती.
या उलट टेस्लाचा प्लांट भारतात टाका तुम्हाला अनेक सवलती मिळतील अशी ऑफर भारताने दिली होती. या मुद्द्यावर टेस्लाचा भारतीय कार बाजारातील प्रवेश गेल्या दीड वर्षापासून रखडला आहे. गेल्या आठवड्यात मोदी आणि मस्क यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर सोमवारी टेस्लाने नोकर भरती सुरु केली आहे. त्यामुळे लवकरच टेस्लाचा भारतात प्रवेश होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.