काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात भारतीय जवानांकडून कारवाई सुरुच आहे. यामध्ये आता सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमधील दाचीगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांने एका मोठ्या दहशतवाद्याला ठार केले आहे. जुनैद अहमद भट हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता. त्याने नागरिकांची हत्या केली होती. तसेच इतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये देखील त्याचा सहभाग होता. ऑपरेशन दचीगामबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, दचीगाममध्ये अजूनही ऑपरेशन सुरू आहे. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि CRPF यांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. शोध मोहिम सुरु असताना जेव्हा सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरले तेव्हा त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यानंतर ही चकमक सुरु झाली.
सुरक्षा दलांला जंगलात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने येथे शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांना जेव्हा जवानांनी वेढले तेव्हा प्रत्युत्तराच्या कारवाईने ही चकमक सुरू झाली. ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला आहे.
भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने या ऑपरेशनसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे. नॉर्दर्न कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांनी चिनार वॉरियर्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे उत्कृष्ट समन्वय, तत्पर कारवाई आणि ऑपरेशन दचीगममधील ऑपरेशन अचूकपणे पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले आहे. या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला आहे. दाचीगम हे शहराच्या बाहेरील राष्ट्रीय उद्यान आहे. हे सुमारे 141 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.