नुकतीच राज्यात आणि देशात होळी आणि धूलिवंदन सण साजरे करण्यात आले. यंदा गोरेगावमधील अभिमान मित्र परिवार संस्थेने वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली . दिनांक २४ व २५ मार्च रोजी नेरे पनवेल इथल्या ‘शांतीवन’ आश्रमातल्या आजी-आजोबांसोबत संस्थेने होळी आणि धूलिवंदन सण साजरे केले. तसेच तेथे कुष्ठरोग निवारण समितीचे हॉस्पिटल व तिथल्या पेशंटशी गप्पा मारल्या.

याचबरोबर, जवळपास ४५० विद्यार्थी संख्या असलेल्या आदिवासी मुलांच्या निवासी शाळेला भेट देत त्यांना २ क्रिकेट बॅट, वॉलीबॉल, ४ बॅडमिंटन रॅकेट सेट, शटल इत्यादी भेटवस्तू देखील दिल्या. यानंतर राजीव राजन आधार घराला भेट देत तेथील आजी-आजोबांना पालक गटाच्या महिला सभासदांकडून घरी केलेल्या पुरणपोळ्यांचा खाऊ, जवळपास एका महिन्याचं धान्य भेट म्हणून देण्यात आले.

दरम्यान, रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांसाठी सर्वांनी एकत्र गाणी, कविता असा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी तेथील लोकांनी देखील सहभाग घेतला होता. या शिवाय शांतीवन आश्रमाचे सचिव विनायक शिंदे सर यांच्याकडे रुपये १५,०००/- ची देणगी चेक स्वरूपात दिली. या भेटीसाठी पालक व त्यांची मुलं असे एकूण २७ जण उपस्थित होते. सध्या या उपक्रमांचीआणि अभिमान मित्र परिवार संस्थेची सर्वत्र चर्चा होत आहे.