‘बिग बॉस मराठी’ या रिएल्टी शोचे पाचवे पर्व आता भेटीला येणार आहे. पण शोची अधिकृत घोषणा झाल्यानंतर चाहत्यांना धक्काच बसला. कारण या सीझनचा होस्ट महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुख असणार आहे. बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता रितेश देशमुख हा कार्यक्रम होस्ट करणार असल्याने चाहत्यांमध्ये बिग बॉस मराठीच्या या सीझनबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पण महेश मांजेरकर हे शो होस्ट का करत नाही, याची चर्चा सुरू आहे.

कलर्स मराठी आणि JioCinema वर ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेळी ‘बिग बॉस मराठी’चे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. ‘कलर्स मराठी’च्या घोषणेनंतर बिग बॉस मराठीचे चाहते उत्सुक दिसले. तर, महेश मांजरेकर यांनीच हा शो होस्ट करायला पाहिजे होता, असाही सूर शोच्या चाहत्यांनी लावला होता. मात्र, महेश मांजरेकर हा शो होस्ट का करत नाही, याची चर्चा सुरू झाली.

महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या आधीच्या चारही सीझनचे होस्ट म्हणून जबाबदारी पार पाडली होती. महेश मांजरेकर यांचे सडतोड वक्तव्य, एखादा स्पर्धक चुकला असेल तर त्याला सुनावणे, स्पर्धकांना अप्रत्यक्षपणे समज देऊन त्याचा गेम सुधरवणे आदी बाबींमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये महेश मांजरेकर नसणार आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, महेश मांजरेकर यांचा बिग बॉस मराठीसाठीचा करार संपुष्टात आला आहे. तर, महेश मांजरेकर यांना पाचव्या सीझनचे होस्टिंग करण्याची इच्छा होती. पण, इतर कामांमुळे त्यांना करार करता आला नसल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कलर्स मराठीने यंदाच्या सीझनसाठी होस्ट म्हणून रितेश देशमुखसोबत संपर्क साधला आणि महाराष्ट्राच्या दादाची या शो मध्ये एन्ट्री झाली.

‘बिग बॅास’चे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये ‘बिग बॅास’च्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.