स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच चर्चेचा विषय असते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक भूमिका घराघरात पोहोचली आहे. अलीकडेच या मालिकेतून कथानकानुसार आशुतोष म्हणजे अभिनेता ओंकार गोवर्धनची एक्झिट झाली. मालिकेत अरुंधतीचा दुसरा नवरा दाखवलेल्या आशुतोषचा अपघातात मृत्यू होतो आणि त्यानंतर अरुंधतीचा नवा प्रवास सुरू होतो, असं दाखवण्यात आलं आहे. आशुतोषच्या एक्झिटविषयी अलीकडेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने एक खास पोस्ट लिहिली होती. ज्यावर एका प्रसिद्ध अभिनेत्याने देखील आशुतोष एक्झिटबाबत दुःख व्यक्त केलं.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने काही फोटो शेअर करत लिहिलं होतं, “मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय…आशुतोषचं ‘जाणं ‘ अनेकांना आवडलं नाहीये…कसं आवडेल…आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला… पण स्वीकाराव्या लागतातच…तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल…गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे…१२/१३ तास सलग असे काही दिवस रडते आहे…अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो..हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते, इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच…डेलीसोप मध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही (unwind होण्यासाठी ) आणि त्याचे परिणाम दिसून येतात.”

“अरुंधती आशुतोषला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय. ओंकार, आपल्या फालतूपासून गंभीर विषयावरच्या गप्पा, ९०च्या दशकातील गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच…पण हा प्रवास कायम स्मरणात राहील…तुम्ही पाहत राहा…’आई कुठे काय करते’ सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता,” असं मधुराणीने लिहिलं होतं.

याच पोस्टवर अभिनेता अभिजीत केळकरने प्रतिक्रिया दिली होती; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अभिजीतने लिहिलं होतं, “मी स्वतः एक अभिनेता असूनही मला आशुतोषचं जाणं सहन होत नाहीये किंवा स्वीकार करता येणार नाहीये आणि त्याही पलीकडे जाऊन, यापुढे तुला त्याच्याशिवाय, तसं पाहणं…हे तुमच्या वरचं प्रेम म्हण, सवय म्हण किंवा आणखीन काही…”