kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबईतल्या मिठी नदीच्या घोटाळ्याप्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी

मुंबईत 26 मे 2025 रोजी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. मान्सूनपूर्व पावसातच मुंबईकरांची उडालेली तारांबळ पाहता, ऐन पावसाळ्यात काय स्थिती असेल, याचा अंदाज लावण्यास पुरे आहे. या दोन दिवसांच्या पावसानं काही प्रश्नही उपस्थित केले. त्यात प्रामुख्यानं मुंबईतील नालेसफाई आणि मिठी नदी गाळ काढण्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटनांमागे तशी अनेक कारणं असली, तरी प्रामुख्यानं नालेसफाई आणि मिठी नदीची स्वच्छता व्यवस्थित न होणं ही मुख्य कारणं मानली जातात. त्यात 2017 ते 2021 या वर्षांदरम्यान मिठी नदी गाळ काढण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमधील सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं नाव म्हणजे अभिनेता डिनो मोरिया.

अभिनेता डिनो मोरिया हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. त्यामुळे डिनो मोरियाची देखील आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

अनेक हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केलेल्या डिनो मोरियाचं नाव या प्रकरणात आल्यानं अनेकांना धक्का बसलाय. डिनो मोरिया काल (26 मे 2025) मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. डिनोची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. मिठी नदीतील साफसफाईच्या कथित घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात डिनोला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स जारी केलं होतं. त्यानुसार सकाळी 11 वाजता डिनो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. सायंकाळी 7:30 च्या सुमारास डिनो मुंबई पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला. डिनोचा भाऊ सँटिनो मोरियाचीही आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केली.

मिठी नदी गाळ उपसाप्रकरणी SIT स्थापन

मिठी नदीच्या गाळ उपसण्याच्या प्रक्रियेत गेल्या 20 वर्षांपासून सुमारे 1200 कोटी रुपयांच्या कथित अनियमितता आणि गैरवापराचा आरोप आहे. विधान परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात चौकशीची मागणी केली होती.

फेब्रुवारी 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या 20 सदस्यांचं विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आलं आहे.

नक्की प्रकरण काय आहे?

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 2005 ते 2021 पर्यंत हा प्रकल्प सुरू होता.

यासाठी 1100 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण 18 कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गाळ काढण्याच्या कंत्राट प्रकरणी यंत्रे आणि गाळ काढण्याची उपकरणे भाड्याने घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे.

या कंत्राटामध्ये अपव्यवहार करण्यात आला आणि मिठी नदीची सफाई व्यवस्थित झाली नसल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी कंत्राटदार, पालिका अधिकारी आणि मध्यस्थ अशा अनेकांची चौकशी करण्यात आली .

आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 471, 120-ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जोशी, कदम आणि पुरोहित मध्यस्थ आहेत.