पंढरपूरनगरी अवघ्या काही दिवसांत वारकऱ्यांनी फुललेली दिसेल. टाळ-चिपळ्यांच्या गजरात अनेक गावांतून पालख्या निघायला सुरुवात झाली आहे. आज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान तर उद्या माऊलींचे प्रस्थान होणार आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी साऱ्या राज्यभरातून हजारो भाविक पंढरीची वाट चालू लागले आहे. पंढरपूरमध्ये आल्यावर निवासासाठी शासनाने उभारलेल्या 65 एकरावरील भक्तिसागर येथे आपल्या जागा आरक्षित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या 65 एकर जागेत काही वर्षांपूर्वी प्रशासनाने भक्तिसागर हा वारकऱ्यांच्या मोफत निवासासाठी तळ विकसित केला आहे . या ठिकाणी भाविकांना शुद्ध पाणी, डांबरी रस्ते, वीज , स्वच्छतागृहे , दवाखाने, पोलीस व्यवस्था , अग्निशामक यंत्रणा पुरविल्याने हा शहरातील सर्वात मोठा सुसज्ज निवास तळ तयार झाला आहे . याठिकाणी 497 मोकळे प्लॉट तयार केले असून या ठिकाणी भाविक आणि दिंड्या आपले तंबू आणि राहुट्या टाकून निवास करत असतात . आता आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवत असून उद्या माऊली पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे . याशिवाय राज्यातल्या अनेक भागातून विविध संतांचे पालखी सोहळे पंढरपूरकडे वाट चालत आहेत.
आषाढी यात्रा काळात शहरात जवळपास 18 ते 20 लाख भाविक येत असताना नेहमीच निवासाचा प्रश्न उभा राहत असतो . अशावेळी पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि भाविकांनी या 65 एकर जागेवर आपल्या प्लॉटचे आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे . ज्याचे अर्ज आधी येतील त्यांना जागा दिली जाणार असल्याने तातडीने अर्ज देऊन गैरसोय टाळण्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी माझाशी बोलताना सांगितले. यावर्षी याच ठिकाणी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चौथे महाआरोग्य शिबीर घेतले जाणार असून त्यामुळे येथे राहणाऱ्या चार ते पाच लाख भाविकांना जागेवर सर्व प्रकारचे उपचार मिळू शकणार आहेत . या शासनाच्या 65 एकर शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या 16 एकर जागेतही भाविकांच्या निवासाची सोय केली जाणार असल्याने तातडीने आपली जागा आरक्षीत करावी लागणार आहे.