संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावची सुकन्या समीक्षा सुभाष राऊत या पहिल्याच प्रयत्नात लेखा परीक्षक अर्थात ‘सीए’ परीक्षेत उत्तीर्ण होण्यात यशस्वी झाल्या आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या या अंतिम परीक्षेत त्यांनी प्रथम श्रेणीही प्राप्त केली आहे.
सध्या रत्नागिरी शहराजवळील खेडशी येथे वास्तव्य करणाऱ्या रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून पदवी प्राप्त करत असतानाच समीक्षा यांनी ‘सीए’ होण्यासाठी अभ्यास सुरू केला. वडील सुरक्षा रक्षक आणि आई गृहिणी असलेल्या सामान्य कौटुंबिक परिस्थितीत आणि उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना त्यांनी कष्ट आणि जिद्दीच्या बळावर हे सुयश मिळविले.
दररोज १४ ते १५ तास अभ्यास करून समीक्षाने पहिल्याच प्रयत्नात ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. श्री. पाध्ये (सीएस) आणि सीए हिमांशु जागुष्टे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.
सगळे मार्गदर्शक शिक्षक आणि प्रोत्साहन देणारे आईवडील तसेच मित्रपरिवार यांच्याविषयी समीक्षाने कृतज्ञता व्यक्त केली. ‘सीए’च्या परीक्षेतील सुयशाबद्दल समीक्षावर अभिनंदन होत आहे.