विश्वात भारताला शोभूनी राहो अशा पध्दतीची कल्पना मांडणाऱ्या सानेगुरुजीच्या अशा या जगविख्यात असलेल्या अनेकानेक गोष्टीतून राष्ट्राचा एकसंघपणा, संसदीय लोकशाही प्रणाली, अखंडता, एकात्मता टिकवण्यामध्ये आपण निश्चितपणाने भारतवासीय यशस्वी झालेलो आहोत. या भारताचा नागरिक म्हणून, भारतवासीय म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेला सार्थ अभिमान अधिक मजबूत करण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात देशाचा प्रजासत्ताक दिन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते झेंडा फडकवून साजरा करण्यात आला.
१५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले पण खंडप्राय आणि अनेक धर्मीय असलेला हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर या देशात नेमकी काय परिस्थितीची व्यवस्था असावी असा प्रश्न पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व स्वातंत्र्याचे प्रणेते महात्मा गांधी या सर्वांच्या समोर आला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती नेमण्यात आली. जगभरातील वेगवेगळ्या व्यवस्थेचा त्यांनी सखोलपणे अभ्यास केला आणि जगाच्या पाठीवर कुठेही नसेल अशी अलौकिक राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील घटना समितीने देशाला दिली. त्यातून संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशात अस्तित्वात आली. जगभरात काही मुठभर लोकांनाच मतदानाचा हक्क असताना या देशात सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार देत केंद्र व राज्य सरकार कुणाचे असावे कुणाच्या विचाराच्या माध्यमातून देश एकसंघ राहू शकतो, प्रगती होऊ शकते याचा अधिकार सर्वसामान्य जनतेला बहाल करण्याचे महान ऐतिहासिक कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून झाले असेही सुनिल तटकरे म्हणाले.
आज सर्वांनाच अभिमान आहे की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतकाल दोन वर्षांपूर्वी साजरा केला. आज याचवर्षी देश ७५ व्या प्रजासत्ताक अमृतकालात प्रवेश करत आहोत. दिर्घकाळ या देशाची लोकशाही प्रणाली व्यवस्था मजबूत होत असताना जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत आपला देश नेत्रदीपक पध्दतीची प्रगती करत आहे अशावेळी देशाची अखंडता, एकात्मता, देशात सामाजिक सलोखा आणि विकसित राष्ट्रांच्या मालिकेत बसण्याचा बहुमान आज आपल्या राष्ट्राने मिळवला आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
देशाचा प्रजासत्ताक दिन गौरवशाली भारताचा चिरायू होवो. पुढील वर्ष आपल्याला उत्तम क्षमतेचे जावो. देश ज्यावेळी ७५ वा प्रजासत्ताक साजरा करेल त्यावेळी देशाच्या या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था अधिक मजबूत झालेली पहायला मिळो अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
एक नागरिक म्हणून स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणून आपल्या सर्वांची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारी योग्य पध्दतीने निभावताना देश बलशाली होण्याचे काम सर्वांच्या हातून होईल. सानेगुरुजीनी म्हटले होते बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो हे सानेगुरुजीचे विचार… त्याकालावधीत विश्वात भारताला शोभूनी राहो अशा पध्दतीची कल्पना मांडणारे सानेगुरुजी होते असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सुरुवातीलाच सुनिल तटकरे यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे,सेवा दलाचे राष्ट्रीय नेते दीपक अनुराग,उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, महिला कार्याध्यक्षा आरती साळवी, युवक अध्यक्ष सुनिल गिरी, सेवादल प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लावंघरे, मच्छिमार सेल राज्यप्रमुख चंदू पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.