उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन सहकारी बँकेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीच्या कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादले आहेत. त्यानुसार आता कोटक बँकेच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगवर बंदी असेल. ही बंदी तात्काळ लागू होणार आहे.
२०२२ आणि २०२३ या वर्षांच्या इन्कम टॅक्स विवरणाच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरबीआयनं बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत ही कारवाई केली आहे. आरबीआयला आयटी इन्व्हेंटरी, पॅच मॅनेजमेंट, युजर अॅक्सेस, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी आणि डिझास्टर रिकव्हरीमध्ये महत्त्वपूर्ण त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यात बँकेला अपयश आलं आहे हेही निर्बंधांमागील एक कारण आहे.
सलग दोन वर्षे आयटी रिस्क आणि सुरक्षा व्यवस्थापनाच्या संदर्भात बँकेत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यात सुधारणा करण्यास वेळ देऊनही त्रुटी दूर करण्यात बँकेला अपयश आलं. याशिवाय, गेल्या दोन वर्षांत कोअर बँकिंग सिस्टीम आणि डिजिटल चॅनेल्समध्ये वारंवार गंभीर घोळ दिसून आला आहे. रिझर्व्ह बँकेशी उच्चस्तरीय संबंध असूनही बँकेला दैनंदिन कामकाजात सुधारणा करण्यात अपयश आलं आहे. क्रेडिट कार्डशी संबंधित व्यवहारांसह डिजिटल व्यवहारांमध्ये वेगानं वाढ झाल्यामुळं आयटी यंत्रणेवरील बोजा वाढला आहे, असं आरबीआयनं म्हटलं आहे. ग्राहकांच्या हितासाठी आणि भविष्यातील दीर्घकालीन सेवेत अडथळे येऊ नयेत म्हणून हे निर्बंध घातले आहेत, असंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.