महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा भव्यदिव्य सोहळा आज आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून मंडप सजावटीचे काम अंतिम टप्यात आले आहेत.
रोज आझाद मैदानावर फिरणाऱ्यांची व क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची गर्दी असते. आज मात्र, या ठिकाणी भव्य मंडप उभारला असून मैदानावर आलीशान सोफे, हिरवे गालिचे टाकण्यात आले आहे. मंडपाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर व्यक्ति उपस्थित राहणार आहेत. १९ राज्यांचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
राज्यात २३ तारखेला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. जनतेने महायुतीला भरभरून यश दिले. महायुतीच्या तब्बल २३७ जागा निवडून आल्या असून महायुतीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मुख्यमंत्री पदावरून गेले १० दिवस तिढा निर्माण झाला होता. मात्र, हा तिढा आता सुटला आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचे भाजपच्या कोअर कमिटीने जाहीर केलं. त्यापूर्वी महायुतीचा शपथविधी आझाद मैदानावर होणार असल्याचे जाहीर करत शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली होती. ही तयारी अंतिम टप्यात आली आहे.