राज्यात सध्या सगळीकडे होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय. कोकणात रात्रीपासूनच शिमगोत्सवाचा फिवर पाहायला मिळतोय. रत्नागिरीच्या ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षातून एक वेळा होणारी भेट पाहण्यासाठी भाविक आतूर होते. ढोल ताशांच्या गजरात डोळ्याचे पारणे फेडणारा पालखी भेटीचा सोहळा पाहायला मिळाला. या पालखी भेटीनंतर रत्नागिरी शहरातील शिमगोत्सवाला सुरवात होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनीही शिमगोत्सवात हजेरी लावली असून पालखी नाचवली.

संपूर्ण कोकण उत्सवप्रिय कोकण म्हणून ओळखला जातो… पालखी नाचवणे एक प्रकारची पर्वणी असते. कितीही उच्च पदावर गेलो तरी ही आमची श्रद्धा आहे. सामान्य ग्रामस्थ म्हणून पालखी नाचवीत असतो. त्यात आपली मुलं ही असतात. पालखीचं वजन खूप असतं. त्यातही एवढं वजन घेऊन एक एक पाऊल टाकणे कौशल्य असतं, असं भास्कर जाधव म्हणाले.

मी लहान असताना वडील माझ्या खांद्यावर पालखी द्यायचे. 55 ते 57 वर्षांपासून पालखी नाचवतोय. शिमग्यातील संकसूर… गोमू.. ही नमन आणि परंपरा जपलेली कला आहे. त्यांच्यावर टीका करणं म्हणजे कलेचा अपमान आहे. श्रद्धेचा अपमान करणं ही राजकारणातील काही लोकांना लागलेली विकृती… ते परंपरांचा अपमान करतात, असं म्हणत भास्कर जाधव यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.