दिशा सालियन मृत्यूप्रकरणी दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात काही गंभीर दावे केले आहे. या प्रकरणातील वकील निलेश ओझा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. झी२४ तास या वृत्तवाहिनीशी बोलताना दिशा सालियान प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत नेमकी काय मागणी करण्यात आली आहे याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. दिशी सालियनच्या वडीलांनी केलेल्या याचिकेबद्दल बोलताना वकील ओझा म्हणाले की, “ही जनहित याचिका डिसेंबर २०२३ ची आहे आणि यामध्ये आम्ही १२ जानेवारी २०२४ रोजी लेखी तक्रार दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात दिशा सालियन यांच्या वडिलांची मागणी आहे की, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट पक्षकार संघटनेच्या अध्यक्षा राशिद खान पठाण यांनी १२ जानेवारी २०२४ ला रितसर लेखी तक्रार दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, आदित्य ठाकरे आणि इतर यांनी दिशा सालियन हिचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली आणि तो गुन्हा लपवण्यासाठी पोलिसांच्या मदतीने खोटा रिपोर्ट तयार केला, की ती आत्महत्या होती. त्या प्रकरणात या सगळ्या आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आयपीसी ३७६ डी, ३०२, १२० ब, ३४ या कलमांतर्गत यांच्यावर कारवाई करत एफआयआर नोंदवण्यात यावा.”
“दोषी पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, खोटे रिपोर्ट तयार केले, त्यांच्यावर देखील केस दाखल करण्यात याव्या आणि कारवाई करण्यात यावी. या आरोपींना कस्टडीत घेण्यात यावे आणि यांच्या नार्को टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट अशा सर्व चाचण्या करण्यात याव्या आणि सत्य जनतेपुढे आणावे आणि आमचं जर काही खोटं असेल तर आमच्यावर कारवाई करावी,” असेही दिशा सालियनचे वकील म्हणाले.
“नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडे चौकशीचे रेकॉर्ड आहे. तेव्हा एनसीबीचे जे अधिकारी होते, समीर वानखेडे त्यांनी या केसच्या चौकशीत आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सुरज पांचोली त्यांचे बॉडिगार्ड हे दिशा सालियनच्या फ्लॅटवर दोन ते तीन तास होते याचे सगळे गोळा केलेले पुरावे फाइलमध्ये त्यांच्याकडे आहेत. त्यांना पण आदेश द्यावा आणि ते कोर्टापुढे सादर करावेत ही देखील मागणी केली आहे,” असेही वकील म्हणाले.