kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! ‘लवकरात लवकर तिथून निघा’ सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन

सीरियामध्ये अंतर्गत तणाव वाढल्यानंतर आता भारत सरकारने सावधगिरीचे उपाय योजले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या असून भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सीरियातील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या अलेप्पो शहरावर जिहादी सैनिकांनी ताबा मिळवला आहे. आता हे जिहादी सीरियाची राजधानी दमिश्ककडे वळले असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी सीरियात प्रवास करणे टाळावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी रात्री सांगितले. तसेच सीरियात असलेल्या भारतीय नागरिकांनाही लवकरात लवकर सीरिया सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, सीरियातील विद्यमान परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सीरियातील प्रवास टाळावा. तसेच सध्या सीरियात असलेल्या भारतीय नागरिकांनी दमिश्कमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधावा यासाठी +963 993385973 या क्रमांकावर आणि [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, अशा सूचना दिल्या आहेत.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल हे सीरियामधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी सांगितले, “सीरियाच्या उत्तरेकडे निर्माण झालेल्या तणावाची आम्ही दखल घेतली आहे. त्यावर आमचे बारीक लक्ष आहे. सीरियात जवळपास ९० भारतीय नागरिक आहेत. ज्यापैकी १४ जण संयुक्त राष्ट्राच्या विविध संघटनांसाठी काम करत आहेत.” नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.

सीरियामध्ये मागच्या दोन आठवड्यांपासून पुन्हा एकदा जुना संघर्ष पेटला आहे. २०११ मध्येही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यामुळे सीरियात लाखो लोक मारले गेले होते आणि तेवढेच लोक बेघर झाले होते. सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारला उलथून लावण्यासाठी काही बंडखोर गटांनी सशस्त्र उठाव सुरू केला आहे. २०११ सालीही अशाच प्रकारचा उठाव केला गेला होता, मात्र त्यावेळी हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता.