राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपावरून चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच राज ठाकरेंनी राज्यातील विकास कामांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी मनसे नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघांबद्दल आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला अनेक महत्त्वाचे मनसे नेते उपस्थित आहे. सध्या शिवतीर्थावर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे हे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत राज्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे. एकीकडे ही बैठक सुरु असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने नक्की पडद्यामागे काय राजकारण घडतंय याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत.