जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स नेहमीच भारत दौऱ्यावर येत असतात. सध्या ते भारतात आले आहेत. विशेष म्हणजे बिल गेट्स यांनी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यासोबत वडा-पावचा आस्वाद घेतला. दरम्यान, हा प्रकार एका जाहिरातीचा टीझर असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण व्हिडिओ क्लिपच्या शेवटी ‘लवकरच सेवा देऊ’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.
तथापि, आतापर्यंत सचिन तेंडुलकर किंवा बिल गेट्स यांनी अधिकृतपणे कोणत्याही व्यावसायिक कराराची अधिकृत घोषणा केलेली नाही. हा व्हिडिओ शेअर करताना बिल गेट्स यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहिले की, “कामावर जाण्यापूर्वी नाश्ता करताना.”
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त भारतात आले आहेत. येथे आल्यानंतर त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींचीही भेट घेतली.
गेट्स यांनी नुकतेच त्यांच्या एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ते येथे आले आहेत कारण भारतामध्ये स्मार्ट लोक आहेत, ज्यांना काहीतरी साध्य करायचे आहे. ते म्हणाले की, भारतातील लोकांना नवीन मार्गांनी समस्यांचे निराकरण कसे करावे हे माहित आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकर अलीकडेच आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये इंडिया मास्टर्स संघाचे नेतृत्व करताना दिसला. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे संघ सहभागी झाले होते. मात्र भारत आणि वेस्ट इंडिजलाच अंतिम फेरी गाठता आली.
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव करून ट्रॉफी जिंकली.