इंग्रजी वर्ष 2024 संपत आलंय. आता 2025 सुरु होण्यास एक महिन्याचा कालावधी आहे. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात कालनिर्णयची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असते. मराठी माणसांच्या घरोघरी भिंतीवर ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ या जाहिरातीसह विराजमान असलेले कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय ! आज घराघरात प्रत्येकाच्या तोंडात कालनिर्णय हे नाव असतच .. दरवर्षी अनेक कॅलेंडर निघत असली तर कालनिर्णयची लोकप्रियता कायम राहिली आहे. रोजचे पंचांग, दिनविशेष, राशिभविष्य, मान्यवरांचे लेख या आणि वेगवेगळ्या माहितींसह भरगच्च असे कालनिर्णयचे कॅलेंडर असते. जयंत साळगावकरांनी 1973 साली कालनिर्णय सुरु केले. ते आजही तितकेच लोकप्रिय आहे. पण या लोकप्रिय असलेल्या कालनिर्णयबाबत सध्या सोशल मीडियावर #boycott_kalnirnay हा ट्रेंड सुरु झाला आहे.
फेसबुक तसंच X (पूर्वीचे नाव ट्विटर) या सोशल मीडियावर हा ट्रेंड सध्या सुरु आहे. आपल्या आवडत्या कॅलेंडरबाबत हा ट्रेंड सुरु झालेला पाहून अनेक युझर्सनी आश्यर्य व्यक्त केलं असून त्याचं कारण विचारलं आहे.
काय आहे कारण?
विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या ‘मृद्गंध पुरस्कार’ वितरण नुकतंच पार पडलं. सुरेखा पुणेकर (लोककला), सुरेश सावंत ( सामाजिक क्षेत्र),आदेश बांदेकर (अभिनय व सूत्रसंचालन), सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा-संगीत क्षेत्र),दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) ज्ञानेश महाराव (लेखक आणि पत्रकार ) यांना हा पुरस्कार देण्यात आला. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, यराज साळगावकर (संपादक, कालनिर्णय), श्री. संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त, ठाणे) हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सोशल मीडियातील पोस्टनुसार जयराज साळगावकर यांच्या हस्ते ज्ञानेश महाराव यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे नाराज होऊन काही युझर्सनी #boycott_kalnirnay सुरु केला आहे. या सर्व युझर्सनी यापूर्वीही महाराव यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याचा फटका त्यांना हा पुरस्कार देणारे जयराज साळगावकर आणि त्यांच्या कालनिर्णय कॅलेंडरला बसतोय. कालनिर्णय कॅलेंडर घेऊ नका असं आवाहन या पोस्टच्या माध्यमातून युझर्स करत आहेत.