भर पावसात मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे सकाळी घरातून निघालेल्या चाकरमान्यांना ऑफिस गाठण्यासाठी उशीर होतो आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. जलद लोकलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा या ठिकाणी जाणाऱ्या नोकरदार वर्गाचा खोळंबा झाला आहे.
नेमकं काय घडलं आहे?
Mumbai मधल्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ जलद मार्गावरच्या लोकल ट्रेन थांबल्या आहेत. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी वापरण्यात येणारे बांबू ओव्हरहेड वायरवर पडले आहेत. त्यामुळे जलद मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. बांबू बाजूला केल्याशिवाय ओव्हरहेड वायर पूर्ववत होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी जलद मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच जलद मार्गावर हा खोळंबा झाला आहे. माटुंगा, कुर्ला, घाटकोपर या रेल्वे स्थानकांच्या मागे पुढे जलद लोकल थांबल्या आहेत. मुंबई ट्रेन अपडेट्स या फेसबुक ग्रुपचे प्रमुख मंदार अभ्यंकर यांनी याविषयी पोस्ट केल्या आहेत. तसंच त्यांनी यासंदर्भातले व्हिडीओही पोस्ट केले आहेत. मागील ३० ते ४० मिनिटांपासून हा खोळंबा झाला आहे.
मध्य रेल्वेने काय म्हटलं आहे?
मध्य रेल्वेने हा बिघाड लवकरच दूर केला जाईल आणि Mumbai Local ची वाहतूक पूर्ववत केली जाईल असं म्हटलं आहे. मात्र अद्याप हे काम झालेलं नाही. त्यामुळे चाकरमान्यांचा ऑफिसमधला लेटमार्क आज पक्का आहे यात काहीही शंका नाही. अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून चालत जाणं पसंत केलं आहे. अनेक लोक चला वारीला जाऊ अशा घोषणा देत ट्रॅकवरुन चालत निघाले आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून हे बांबू हटवण्याचं काम सुरु आहे. दुसरीकडे लोकांनी चालत जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे तसंच जलद लोकल हळूहळू धीम्या मार्गावर वळवण्यात येत आहेत.