फक्त दोन टी-शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये एण्ट्री करणारा सूरज चव्हाण आता या सिझनचा विजेता ठरला आहे. गुलिगत सूरजची अनोखी स्टाइल सोशल मीडियावर हिट होतीच, पण आता बिग बॉस मराठीमुळे त्याला आणखी लोकप्रियता मिळाली आहे. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर यांना मात देत सूरजने ‘बिग बॉस मराठी 5’चं विजेतेपद पटकावलं आहे. रविवारी (6 ऑक्टोबर) या सिझनचा ग्रँड फिनाले धूमधडाक्यात पार पडला. फिनालेपूर्वी दोन आठवडे शोमधून गायब असलेल्या रितेश देशमुखने अंतिम सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. यावेळी हा फिनाले बघण्यासाठी रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखसुद्धा तिथे पोहोचली होती. ग्रँड फिनाले पार पडल्यानंतर जिनिलियाने सूरजसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

‘यातूनच स्वप्ने बनतात, मोठी स्वप्ने पाहा. बिग बॉस मराठीची ही ट्रॉफी तुझीच होती,’ अशा शब्दांत जिनिलियाने सूरजचं कौतुक केलं. यानंतर तिने पती आणि ‘बिग बॉस मराठी 5’चा सूत्रसंचालक रितेश देशमुखसाठीही दोन ओळी लिहिल्या आहेत. ‘रितेश हा शो जबरदस्त होता. तू ज्या पद्धतीने हा शो पुढे नेलास, ते कमालीचं होतं. तू बेस्ट आहेस’, असं तिने म्हटलंय त्याचसोबत बिग बॉस मराठीच्या पुढच्या सिझनसाठीही तिने उत्सुकता व्यक्त केली आहे.

बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावल्यानंतर सूरजच्या फॉलोअर्सचा आकडा आणखी वाढला आहे. सूरज हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून इन्स्टाग्रामवर त्याचे 21 लाख फॉलोअर्स आहेत. आपल्या विनोदी आणि अनोख्या स्टाइलमुळे सूरजला लोकप्रियता मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना त्याला खेड्यापाड्यातील चाहत्यांकडून मोठा पाठिंबा मिळाला. याच लोकप्रियतेच्या जोरावर सूरजने ही ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.

‘बिग बॉस मराठी 5’मध्ये गायक अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर होता, तर निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानी राहिली. धनंजय पोवार चौथ्या क्रमांकावर आणि अंकिता वालावलकर पाचव्या स्थानी होती. बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच विजेता सूरज चव्हाणला 14.6 लाख रुपये कॅश प्राइज मिळाली. इतकंच नव्हे तर त्याला 10 लाख रुपयांचं ज्वेलरी वाऊचर आणि एक बाईकसुद्धा मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *