अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नवीन आयात शुल्क (टॅरिफ) धोरणाचा जगभरातील अनेक देशांना फटका बसला आहे. इतकंच नव्हे तर ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील अनेक देशांच्या शेअर बाजारांवर मोठे परिमाण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अमेरिकेने चिनी वस्तूंवर ३४ टक्के आयात शुल्क लावलं असून एकूण १०४ टक्के आयात शुल्क लावण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प सरकारने भारतीय वस्तूंवरही २७ टक्के आयात शुल्क लावलं आहे. अशातच भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते म्हणाले, “अमेरिकेने सुरू केलेल्या ‘टॅरिफ वॉर’विरोधात भारत व चीनने एकत्र यायला हवं.”
चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत व चीनने एकत्र आलं पाहिजे. चीन-भारत आर्थिक व्यापारी संबंध परस्पर फायद्यांवर आधारित आहेत. अमेरिका आयात शुल्काचा गैरवापर करत असल्याने आपल्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या अडचणींना तोंड देण्यासाठी विकसनशील देशांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे.”
यू जिंग म्हणाले, “चीन इकोनॉमिक ग्लोबलायजेशन व मल्टीलेटरलिझमचा (बहुपक्षीयता) समर्थक आहे. चीनने जागतिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मोठं योगदान दिलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत दरवर्षी सरासरी जितकी वाढ होतेय त्या वाढीत चीनचं ३० टक्के योगदान आहे. जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) केंद्रस्थानी ठेवून बहुपक्षीय व्यापार प्रणालीचं रक्षण करण्यासाठी आम्ही जगाबरोबर काम करत राहू.”
जगातील दोन सर्वात मोठे विकसनशील देश असलेल्या भारत व चीनने अमेरिकेच्या टॅरिफच्या गैरवापराविरोधात एकत्र यायला हवं, असं वक्तव्य करत बीजिंगचे प्रवक्ते म्हणाले, व्यापार युद्धात किंवा टॅरिफ युद्धात कोणीही विजेता नसतो. सर्व देशांनी परस्पर चर्चेच्या तत्त्वांचं पालन केलं पाहिजे. त्याचबरोबर बहुपक्षीयतेचं समर्थन केलं पाहिजे, ते करत असताना एकतर्फीवादाचा संयुक्तपणे विरोध केला पाहिजे.
Leave a Reply