राम भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन होणार आहे. अशात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सामनातून संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. भगवान श्रीरामाचरणी आमचे श्रद्धापूर्वक दंडवत!, पण श्रीरामाच्या जीवन, चारित्र्याशी या ‘मोदी – रामायणा’चा संबंध नाही, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हण्यात आलं आहे. अयोध्येच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी देशाला पुन्हा किमान 500 वर्षे मागे नेलंय. पुराणाच्या वातावरणात नेलंय, असंही सामन्यात म्हंटल गेलं आहे.
वाचा सामना अग्रलेख जसाच्या तसा :
आधुनिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने पूजाअर्चा, व्रत, अनुष्ठाने करीत आहेत, उपवास करीत आहेत. पंतप्रधान सतरंजीवर झोपत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले , ते गमतीचे आहे . अयोध्येत यानिमित्ताने नवे ‘ मोदी रामायण ‘ निर्माण झाले , ते संपूर्ण राजकीय आहे . श्रीरामाच्या जीवन , चारित्र्याशी , रामराज्याशी , सत्य मार्गाशी , संयम आणि शौर्याशी या ‘ मोदी – रामायणा ‘ चा संबंध नाही . त्यांचे रामायण त्यांच्यापाशी. अयोध्येतील मंदिरात विराजमान होणाऱ्या भगवान श्रीरामाचरणी आमचे श्रद्धापूर्वक दंडवत !
अयोध्या पुन्हा सजली आहे, झगमगली आहे. दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाली आहे. 14 वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा पराभव करून श्रीराम अयोध्येस परतले तेव्हा त्यांची ही नगरी अशीच झगमगून आपल्या राजाच्या स्वागतास सज्ज झाली होती. राम 14 वर्षांनंतर परतले तेव्हा त्यांचा महाल, गल्ल्या, रस्ते आनंदाच्या वर्षावाने न्हाऊन निघाले होते. मंगल गाण्यांनी संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. दिवे-पणत्यांनी नगराचा कोपरान्कोपरा उजळून निघाला होता.
अप्सरा जाईजुई, पारिजात, गुलाब पाकळय़ांची उधळण करीत होत्या. भरताच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अयोध्येने श्रीरामांच्या स्वागतात कोणतीच कसर सोडली नव्हती. आज भगवान राम हे तंबूच्या वनवासातून भव्य मंदिरात विराजमान होताना संपूर्ण अयोध्या पुन्हा तशीच उजळून निघाली आहे. संपूर्ण भारत देशात आनंदाच्या लहरी उमटल्या आहेत. कारण श्रीराम हे फक्त हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एक नाहीत, ते राष्ट्राच्या अस्मितेचा प्राण आहेत. त्या अस्मितेसाठी अयोध्येच्या रणभूमीवर मोठा संघर्ष झाला. त्या संघर्षात अनेक रामभक्तांचे बळी गेले.
अनेकांनी तुरुंगवास भोगला. अयोध्येतून वाहणारी शरयू नदी भक्तांच्या रक्ताने लाल झाली तेव्हा कोठे आजचा दिवस सोनेरी किरणे घेऊन उगवला आहे. रामजन्मभूमीची लढाई किमान 500 वर्षांची आहे. या लढाईने अनेक वळणे घेतली. 1528 पासून रामाच्या हक्काच्या निवासाचा वाद सुरू झाला तो 1992 ला संपला.
भारतीय जनता पक्ष आजही श्रीरामाचेच खातो, पण रामाचा विचार, रामराज्य मात्र वाऱ्यावर आहे. सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमीचा खटला चालला व अयोध्येचा निवाडा न्यायालयाने केला. नोव्हेंबर 2019 सालात सुप्रीम कोर्टाने रामप्रभूंच्या बाजूने निकाल दिला.
2.77 एकर वादग्रस्त जमीन हिंदू पक्षकारांना मिळाली. मशिदीसाठी वेगळी पाच एकर जागा देण्याचा आदेश झाला. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनंतर श्रीरामप्रभू त्या तंबूतून बाहेर पडले व फायबरच्या मंदिरात विराजमान झाले. ऑगस्ट 2020 साली राममंदिराचे भूमिपूजन झाले व आज भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील मंदिरात होत आहे. जगभरातील हिंदूंसाठी हा भाग्याचा, गौरवाचा दिवस आहे.