मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे. मुंबईत जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे. मुंबई आणि ठाण्यात मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत अनुक्रमे ४१ आणि ५ असे ४६ गोविंदा जखमी झाले आहेत.

दहीहंडी फोडण्याच्या उत्साहात थरावर उभे राहिलेले अनेक गोविंदा या वर्षीही जखमी झाले आहेत. पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमधून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ४१ गोविंदा जखमी झाल्याची नोंद आहे.

पालिकेच्या केईएम रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जखमी गोविंदांपैकी एकाच्या खांद्याला मार बसला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे ऑर्थोपेडिक विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. दोघांना ऑर्थोपेडिक विभागासाठी दाखल केले होते. सोमवारी सरावादरम्यान एक गोविंदाला मणक्याला फ्रॅक्चर झाल्याने केईएममध्ये दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या बऱ्याचशा गोविंदांना हातापायाला खरचटले आहे. दरम्यान, ८ गोविंदांना पालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये अॅडमिट करावे लागले आहे. २६ गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार केले गेले. ७ गोविंदांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दुपारी १२ वाजेपर्यंत विविध पथकातील १५ गोविंदा जखमी झाले आहे. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात १, नायर रुग्णालयात ४, सायन रुग्णालयात २, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये १, पोद्दारमध्ये ४, राजावाडीमध्ये १, एमटी अगरवार रुग्णालयात १ आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.

या सर्व जखमी गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.