मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे. मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे. तसेच यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत. यावेळी लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1 हजार 354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर ठाण्यात टेंभी नाक्याला मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी असून बक्षिसाची रक्कम पुरुषांसाठी 1 लाख 51 हजार, महिलांसाठी 1 लाख आहे. त्याशिवाय प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत 1 लाख रुपयाच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.