kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला, सुवर्णमंदिरात गोळीबार

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. अमृतसरमध्ये ही घटना घडली आहे. सुखबीर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सुदैवाने ते या हल्ल्यात सुखरुप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल अमृतसर येथील स्वर्ण मंदिराच्या बाहेर दरबान (सुरक्षारक्षक) म्हणून शिक्षा भोगत आहेत. त्याचवेळी हल्लेखोर तिथे आला आणि त्याने बादल यांच्यावर पिस्तूल रोखली. हल्लेखोराने पिस्तूल रोखताच बादल यांच्या भोवती असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं तर, काहींनी हल्लेखोराला पकडले. मात्र, हल्लेखोराने तरीही गोळ्या झाडल्या. सुदैवाने सुखबीरसिंग बादल हे सुखरुप बचावले आहेत. मात्र, तरीही त्यांच्या सुरक्षेत ही मोठी चूक असल्याचे मानले जाते.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडील पिस्तूलदेखील जप्त केली आहे. आरोपीचे नाव नारायण सिंह असल्याचं म्हटलं जात असून तो दल खालसाशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. मात्र सुवर्णमंदिरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून ही सुरक्षेत मोठी चूक असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सुखबीर सिंह बादल यांना शिख समुदायाचे सर्वोच्च न्यायालय म्हणून ओळखले जाणारे श्री अकाल तख्त साहिबने त्यांना धार्मिक शिक्षा सुनावली आहे. ते गुरुद्वारामध्ये सेवा देणार आहेत. मंगळवारी त्यांच्या शिक्षेचा पहिला दिवस होता. तर, शिक्षेच्या आधी त्यांनी सामुदायिक स्वयंपाकघरात भांडी घासली होती. तसंच, काल ते सुवर्णमंदिराच्या गेटबाहेर दरबान म्हणून सेवा देत होते. सुखबीर सिंह बादल यांचा पाय फॅक्चर असल्याने त्यांच्या पायाला प्लास्टर लावण्यात आलं आहे. त्यामुळं ते व्हिलचेअरवरही पहारेदारी करत आहेत.